उर्से येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखून धरणाऱ्या आंदोलकांवर हायवे अॅक्टनुसार गुन्हा दाखल

177

तळेगाव, दि. १० (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.९) पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान तळेगाव पोलिस ठाणे हद्दीतील उर्से येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग काही मराठा आंदोलकांनी रोखून धरला होता. यातील १५० ते १७५ आंदोलकांवर तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मराठा मोर्चातील आंदोलकांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर दोन्ही दिशेचा मार्ग तब्बल सहा तास रोखून धरला होता. पोलिसांकडून वारंवार आवाहन करुन देखील रस्ता मोकळा केला जात नव्हता. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी तब्बल १५० ते १७५ आंदोलकांवर रस्ता अडवणे, जमाव जमवणे तसेच नव्यानेच लागू झालेला हायवे अॅक्ट ८ ब नुसार तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.