उरुळी कांचनमध्ये कार विहिरीत कोसळून सुन आणि सासऱ्याचा मृत्यू

1262

उरुळीकांचन, दि. १० (पीसीबी) – कार चालवण्याचा मोह सुन आणि सासऱ्याच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकांचा लग्न सोहळा आटपून सासऱ्यासोबत कारने घरी निघालेल्या सुनेने कार चालवण्याचा हट्ट केला. यावेळी कारवरील नियंत्रण सुटून कार तुडुंब भरलेल्या खोल विहिरीत पडली यामध्ये सासरा आणि सुनेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.९) सायंकाळी सहाच्या सुमारास उरुळी कांचन जवळील शिंदवणे गावात घडली.

सोनाली गणेश लिंभोणे (वय २२, रा. काळेशिवार वस्ती, शिंदवणे) आणि मारुती उर्फ दादा बबन खेडकर (वय ६०, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) अशी मृत दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उरळी कांचन जवळील एका गावातून लग्न सोहळा आटपून सोनाली आणि तीचे सासरे मारुती हे  त्यांच्या (एमएच/१२/पीझेड/२८२७) कारने गावी परत येण्यासाठी निघाले होते. यावेळी सोनालीने सासऱ्यांकडे कार चालवण्याचा हट्ट धरला. यावर मारुतींनी तिला कार चालवण्यास दिली असता सोनालीचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पाण्याने तुडुंब भरलेल्या खोल विहिरीत जाऊन कोसळली. यामध्ये दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गावकरी आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने गाडी आणि मृतदेह विहिरीबाहेर काढले आहेत.