उपमहापौर घोळवेंचा ‘यूटर्न’. म्हणे, ‘मी शेतकर्यांविरोधात काही बोललोच नाही!’

2

पिंपरी, दि.31 (पीसीबी) : उपमहापौर आणि कामगार नेते केशव घोळवे यांनी कंत्राटी कर्मचारी आणि कामगारांच्या प्रश्नासंबंधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्या विषयीच पत्र राज्यपालांनकडे सुपूर्त केलं. त्याच विषयी त्यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असता त्यांना पत्रकारांच्या अनेक खोचक प्रश्नांना सामोरं जावं लागलंय.

राज्यातील विविध संस्थेतील कंत्राटी कर्मचारी यांना वेतन तसेच मानधन देण्यात यावे तसेच त्यांना नियमित सेवेत समाविष्ठ करण्यात यावे अशा आशयाचे पत्र उपमहापौर घोळवे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना दिले. याच विषयीच्या आयोजित पत्रकार परिषदेत मात्र उपमहापौर घोळवेंना पत्रकारांनी केंद्र सरकारच्या कामगार तसेच शेतकऱ्यांविषयी धोरणावर प्रश्न केले. त्याचवेळी ‘शेतकऱ्यांची माफी कधी मागणार?’ असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘मी शेतकरी तसेच कामगारांचा अवमान होईल असं कुठलंही वक्तव्य केलं नाही’, असं म्हणत पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला.

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांबद्दल उपमहापौर केशव घोळवे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेमध्ये वादग्रस्त विधान केलं होत. याचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. मी एक ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्याचा मुलगा असून कष्टकरी, कामगार, शेतकरी घटकांचा माझ्या मनात नितांत आदर आहे आणि तो कायम राहील असं म्हणत यु-टर्न घेतलाय. एकंदरीतच या सगळयावरून उपमहापौर घोळवे हे आपल्या माफी न मागण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय.

WhatsAppShare