“उपचाराविना कुटुंब उद्ध्वस्त झालेली चालतील, पण पेग्विंन…”; भाजपचा बीएमसीवर हल्लाबोल

51

मुंबई, दि.०३ (पीसीबी) : शिवसेनेची सत्ता असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) स्थायी समितीने भायखळा प्राणी संग्रहालयातील पेंग्विन्सच्या तीन वर्षांसाठीच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपयांच्या निविदेस काही दिवसांपूर्वी मंजुरी दिलेली आहे. विशेष म्हणजे राज्यातील सत्तेत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेसेन या निविदेस विरोध दर्शवलेला होता. शिवाय, भाजपा आणि मनेसेकडूनही या निवेदवरून बीएमसीवर निशाणा साधला गेला होता व विरोध दर्शवला गेला होता. मात्र तरीही बीएमसीकडून ही निविदा मंजूर केली गेली. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी बीएमसीवर टीका केली आहे.

“उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली तरी चालतील, पण पेग्विंन जगला पाहिजे, हेच आहे का बीएमसीचं धोरण?” असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी बीएमसीला उद्देशून केला आहे. तसेच, “युवराजांच्या पेंग्विनवर बीएमसी करते दररोज १ लाख ५० हजार रुपये खर्च” अशी माहिती देत, “परमेश्वरा या चिमुरड्यालही पेंग्विनसारखे भाग्य काही नाही लाभले?” असं देखील एका बाळाचा फोटो शेअर करत नितेश राणे ट्विटमध्ये म्हणाले आहेत. या निविदेवरून भाजपा आणि काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला व पालिका प्रशासनाला लक्ष्य केले होते. हा १५ कोटी रुपये खर्च म्हणजे पालिकेचा तोटा असल्याची टीका दोन्ही पक्षांनी केली होती. मात्र हा विरोध झुगारून बीएमसीकडून निविदेस मंजुरी देण्यात आल्याचे दिसत आहे.

तर, भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीची बाग) पेंग्विन दाखल झाल्यापासून प्राणी संग्रहालयाचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पेंग्विन आल्यानंतर २०१७ पासून पालिके ला १२ कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळाला असल्याचा प्रशासनाचे म्हणणे आहे. पेंग्विनमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे. याचबरोबर मनसेकडूनही मुंबईतल्या वरळीसह काही भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टरवर शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला टोला लगावल्याचं दिसून आलं होतं. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी आहे असा टोलाही मनसेने लगावला होता.