उद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट

186

तिरूअनंतपूरम, दि. २० (पीसीबी) – केरळमध्ये पावसाने उसंत घेतल्याने, हळूहळू पूर ओसरू लागला आहे. पण पूर ओसरल्यानंतरच्या नुसानाची दाहकता महाभयंकर आहे. पुरात आतापर्यंत ३७० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ लाख २४ हजार ६४९ जणांना पुनर्वसन शिबीरात हलवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी केरळमध्ये ५६४५ मदत आणि पुनर्वसन केंद्र उभारली आहेत.

प्रशासनाने १४ जिल्ह्यांत दिलेला रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. पावसाचा जो ओसरल्याने मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. दरम्यान केंद्राची परवानगी मिळवल्यानंतर आजपासून कोच्चीच्या नेवी बेसवरून पॅसेंजर फ्लाईट उड्डाण घेऊ शकणार आहेत. २६ ऑगस्टपर्यंत कोच्ची एअरपोर्ट बंद ठेवण्यात आले होते.

पूर ओसरु लागल्यानंतर केरळात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. पदककुडी गावात महामार्गालागत सुरू असलेल्या एकमेव पेट्रोल पंपावर भल्या मोठया रांगा लागल्या आहेत. अनेक वाहने बंद अवस्थेत असल्याने शेकडो प्रवासी अद्यापही अडकून पडले आहेत. तर बऱ्याच पुलांवर मोठी झाडे, टीव्ही, फ्रिज अश्या अनेक गोष्टी वाहून आलेल्या आहेत. केरळातल्या पुरात आत्तापर्यंत ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.