उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले सिध्दीविनायकाचे दर्शन

145

मुंबई, दि. १० (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) मुंबईतील सिध्दी विनायक मंदिरात जाऊन एकत्र दर्शन घेतले. सिध्दी विनायकाच्या चरणी दोघांनी एकत्र माथा टेकला. भारतीय पोस्ट विभागातर्फे  सिध्दीविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह सर्व विश्वस्त, प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल उपस्थित होते.

भारतीय पोस्ट विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीस आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकाचा फोटो सिध्दीविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार  आहे.