उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र आलं पाहिजे- संजीवनी करंदीकर

293

मुंबई, दि.२९ (पीसीबी)- “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र आले पाहिजे. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ठाकरे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने उद्धव आणि राज या दोघांची समजूत घातली होती. मात्र दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यानंतर झालेल्या काही कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र आले होते. मात्र ठाकरे घराण्यातील एक माहेरवाशीण म्हणून माझे अजूनही हेच मत आहे की आता या दोघांनी एकत्र आले पाहिजे” राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना या भावना व्यक्त केल्या.

ठाकरे घराण्यातल्या अनेक आठवणींनाही संजीवनी करंदीकर यांनी उजाळा दिला. प्रबोधनकार ठाकरेंना पाच मुले आणि तीन मुले. त्यापैकी आता फक्त संजीवनी करंदीकर हयात आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या बहिण. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या त्या आत्या आहेत. गुरुवारी शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर लोकसत्ता ऑनलाईनने संजीवनी करंदीकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

संजीवनी करंदीकर म्हणाल्या की, “राज्याच्या जडणघडणीत प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून उद्धव ठाकरेंपर्यंत प्रत्येकाचे फार मोठे योगदान आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा बाळासाहेबांनी पुढे नेला. आता उद्धव आणि आता आदित्य तोच वारसा पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. हे पाहून, आजच्या दिवशी मला विशेष आनंद वाटतो आहे. जे स्वप्न आजवर आम्ही पहिले, ते पूर्ण होत आहे. कारण राज्याची धुरा ठाकरे कुटुंबातील एका व्यक्तीच्या हाती आलेली आहे आणि नक्कीच भविष्यात राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लागतील” असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

WhatsAppShare