“उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हिंदुवर अन्याय होत होता, तेव्हा या कांचनगिरी होत्या कुठे?”; महापौरांचा जाहीर सवाल

88

मुंबई, दि.१८ (पीसीबी) : साध्वी कांचनगिरी यांनी रविवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असं मत कांचनगिरी यांनी व्यक्त केलं होते. मात्र त्याचवेळी कांचनगिरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचनगिरी यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे.

“शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयी पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या दिवशी भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली नवहिंदु जन्माला येत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. बाळासाहेबांच्या पुत्राने रामजन्मभूमी येथे जाऊन ज्या पद्धतीने काम केले तेव्हा या कांचनगिरी होत्या कुठे आणि त्या कोण आहेत? मुळात अशी प्रगती पुस्तक द्यायचा यांना काय अधिकार? तुम्हाला ज्यांच्या धुरा चालवायच्या आहेत त्या चालवा कारण कोणी कुणासाठीही येऊन उभा राहू शकतं. पण बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रावर त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलावर अशा पद्धतीने महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही,” असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

“मला हाही प्रश्न विचारावासा वाटतो आहे की, उत्तर प्रदेशातील, बिहारमधील हिंदुवर अन्याय होत होता. तेव्हा या कांचनगिरी होत्या कुठे?,” असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. “उद्धव ठाकरे यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे. उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला. त्यासाठी मी नाराज आहे. पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते,” असा आरोप कांचन गिरी यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

कांचन गिरी यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं. “राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प राज ठाकरे पूर्ण करतील. राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत जो पूर्वग्रह झालाय तो मी दूर करेल. ते समजुतदार आहेत त्यामुळे ते हे समजून घेतील,” असंही कांचन गिरी यांनी नमूद केलं.

WhatsAppShare