उत्तर प्रदेशात आराम बस उलटून १७ जणांचा मृत्यू

481

लखनौ, दि. १३ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील मैनपुरीत आज (बुधवार) सकाळी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जण जखमी झाले आहेत. जयपुर- फर्रुखाबाद येथे जाणाऱ्या स्लीपर कोच बसला हा अपघात झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस  डिव्हायडरला जाऊन धडकून उलटली. बस अपघातातील जखमींना सैफई येथील रुग्णालयात  दाखल केले आहे. तिघांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती समजताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे.

दरम्यान, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींवर तातडीने योग्य उपचार करण्याचे रुग्णालयांना सुचना    दिल्या आहेत.