उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर आता ट्विटरची कारवाई

36

नवी दिल्ली, दि. १७  (पीसीबी) – आक्षेपार्ह विधान केल्यामुळे निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तीन दिवसांसाठी प्रचारात भाग घेण्यास बंदी घातल्याची कारवाई ताजी असतानाच आता दुसरीकडे ट्विटरने योगींना झटका दिला आहे. मुस्लीम लीगबाबत केलेले वादग्रस्त ट्विट निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपा नेते गिरिराज सिंह, आमदार मनजिंदर सिंह सिरसा, अभिनेत्री कोयना मित्रा आणि माजी सैन्य अधिकारी सुरेंद्र पुनियाचे काही ट्विटही हटवण्यात आले आहेत.

जातीय टिपण्णी केलेली अशी ३४ ट्विट्स ट्विटर इंडियाने हटवली आहेत. एकतर हे ट्विट्स डिलिट करण्यात आली आहेत किंवा भारतात हे ट्विट दिसण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जातीयवादी आणि द्वेष निर्माण करणाऱी विधाने करणाऱ्यांवर कारवाई न केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर मंगळवारपासून ७२ तासांची प्रचारबंदी घातली.

योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ट्वीट करुन मुस्लिम लीगला व्हायरस असे संबोधले होते. त्यांनी लिहीले होते की, मुस्लीम लीग असा व्हायरस आहे ज्याने कोणी संक्रमित झाले तर तो वाचू शकत नाही. आज तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच याने संक्रमित झाला आहे. विचार करा जर हे जिंकले तर काय होईल. हा व्हायरस संपूर्ण देशात पसरेल. योगींच्या या विधानापूर्वी असे सांगण्यात आले होते की, राहुल गांधींच्या रोड शोमध्ये मुस्लीम लीगचे झेंडे फडकावण्यात आले होते.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये योगींनी म्हटले होते की, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात मंगल पांडेंसोबत संपूर्ण देश इंग्रजांविरोधात होता. त्यानंतर हा मुस्लिम लीगचा व्हायरस आला आणि असा पसरला की त्याने संपूर्ण देशाची फाळणीच करुन टाकली. आज पुन्हा एकदा तोच धोका दिसतो आहे. हिरवे झेंडे पुन्हा फडकावले जात आहेत. काँग्रेस मुस्लिम लीगच्या व्हायरसने संक्रमीत झाली आहे, त्यांच्यापासून सावध रहा.