ई-लर्निंग संच आणि शिलाई मशिन्स प्रदान

83

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी टाटा ब्ल्यूस्कोप स्टील प्रा.लि. (पुणे) या कंपनीतर्फे मावळ तालुक्यातील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग संच भेट देण्यात आला.

या संचामध्ये प्रक्षेपक, पटल, संगणक, संगणकप्रणाली यांचा समावेश आहे. त्यासोबतच अन्य चार संगणक, कपाटे, टेबल्स, खुर्च्या असे साहित्य देण्यात आले. कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस.आर.) अधिकारी शिक्षा मिश्रा यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षक केंद्र प्रमुख, तालुका शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत हे साहित्य स्वीकारले. त्याचप्रमाणे ग्रामीण महिला सबलीकरणासाठी आर. डी. ऑर्गनिक फार्मच्या आवारात शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू शहरात विकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठीही टाटा ब्ल्यूस्कोप स्टील कंपनीने शिलाई मशिन्स प्रदान केले.

समाजातील गरजू व्यक्ती आणि संस्था यांना योग्य ती मदत मिळवून देणे, कंपन्यांच्या सी.एस.आर. विभागाशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गरजांची पूर्तता करणे आणि मदत म्हणून दिलेल्या वस्तूंचा योग्य वापर व्हावा यासाठी लक्ष देणे, यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सने एका विशेष फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे दोन्ही उपक्रम राबविण्यात आले; तसेच या दोन्ही उपक्रमांसाठी डॉ. संजय लकडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रसंगी लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल हेमंत नाईक, लायन्सचे केंद्रीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, विभागीय अध्यक्ष कविता चेकर, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सचे अध्यक्ष नरेंद्र पेंडसे, उपाध्यक्ष दीपश्री प्रभू, सचिव प्रसाद दिवाण, सदस्य जया सिंघवी, महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम-चिंचवड शाखाध्यक्ष सुरेश गुरव, सचिव यशवंत भोंग, कातकरी विकासप्रमुख स्वप्निल वाघमारे यांची उपस्थिती होती. संगीता शाळिग्राम आणि रजनी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वनिता लकडे यांनी आभार मानले.