‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’;  राष्ट्रवादीच्या खासदारांची दिल्लीत निदर्शने  

145

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतून  ईव्हीएम हटवण्यात यावे, या मागणीवरून आज (बुधवार) राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदारांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ अशी घोषणाबाजी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, वंदना चव्हाण, फौजिया खान आदी उपस्थित होते.

सर्व विरोधी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी  निवडणूक आयोगाची भेट घेऊन ईव्हीएम विरोध केला होता. १७ राजकीय पक्षांनी ईव्हीएमला विरोध केला आहे.  ईव्हीएममध्ये फेरफार  होत असल्याची तक्रार या सर्व राजकीय पक्षांनी  केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतील मतदान मतपत्रिकेवर घेण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी  केली.

ईव्हीएमवर बंदी घालण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ते आम्हाला न्याय देतील, असेही सुप्रिया सुळे  यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून ईव्हीएमवर बंदी घालण्याबाबत  आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर भाजप वगळता सर्व पक्षाच्या प्रमुखांना राज ठाकरे यांनी पत्र लिहून ईव्हीएमविरोधात पुढे येण्याचे आवाहन केले आहे.