ईव्हीएममध्ये बिघाड; विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाणार

83

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) –  निवडणूक आयोग योग्यरित्या काम करत नाही, तसेच ईव्हीएममध्येही बिघाड आहे. एकाला मत दिल्यावर ते दुसऱ्याला जात आहे. व्हीव्हीपॅटमध्ये फक्त ४ सेकंदच फोटो दिसतो. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधक पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत, अशी माहिती  काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी आज (रविवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.

ईव्हीएम मशीनमधील काही बटन खराब आहेत. ज्या ठिकाणी भाजपचे  वातावरण नाही, तिथे मशीनमध्ये बिघाड केले जात  आहे, असा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी  केला  आहे.

दिल्लीत  आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू,  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,  कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी  आदी नेते उपस्थित होते.

व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के स्लिप मोजल्या गेल्या पाहिजेत.  सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आपल्या एका निर्णयात व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी वाढवली पाहिजे, असे म्हटले होते. त्यामुळे  न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावमी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच ही मागणी करणारे २१ पक्ष देशातील ७० टक्के जनतेंचे प्रतिनिधित्व करत आहेत, असे ते म्हणाले.