ईव्हीएमबाबत आपल्या मनात कुठलीही शंका नाही; अजित पवारांचा शरद पवारांना घरचा आहेर

113

पुणे, दि. १४ (पीसीबी)  ईव्हीएमबाबत आपल्या मनात कुठलीही शंका नाही, ईव्हीएममध्ये दोष असता तर भाजप पाच राज्यांमध्ये हरली नसती, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना  घरचा आहेर दिला आहे.  

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार हरले नसते. पण काहींच्या मनात शंका आहे. आता यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे, असे अजित पवार म्हणाले.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र ईव्हीएमवर विश्वास नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नकोच, अशी राष्ट्रवादीची भूमिका राहिली असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी  केले होते. बारामतीची जागा जिंकण्याचे धाडसाने सांगतात, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने ईव्हीएमशी छेडछाड करण्याचे काही नियोजन केले आहे का,  अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचे पवारांनी बोलून दाखवले होते.