“ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरला पाठवा. दहशतवादी पळून जातील. आणि किरीट सोमय्यांना….

47

मुंबई, दि.१८ (पीसीबी) : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच असून, परिस्थिती चिघळली आहे. रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातून सर्व परप्रांतीय मजुरांना सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये दाखल करण्यात येत आहे. पंधरा दिवसांत ११ बळी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत दहशतवाद्यांनी ११ नागरिकांची हत्या केली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

“कधी काश्मिरी पंडितांना मारलं जात आहे. ही जबाबदारी केंद्र सरकार गृहमंत्रालयाची आहे. याच्यावर तोडगा निघाला नाही तर नुसत्या पाकिस्तानच्या बाबतीतील धमक्यांची भाषा वापरून हे थांबलं जाणार नाही. चीन लडाखमध्ये घुसले आहे. सांगा की चीनवर सर्जिकल स्ट्राईक करू म्हणून. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढंच मी सांगू शकतो,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

भारत पाकिस्तान सामने व्हायला हवेत का यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “पाकिस्तानसोबत कसे संबंध प्रस्तापित करायचे याचा निर्णय सरकारला एकदा घेऊद्या मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या मतलबाप्रमाणे राजकीय सोईच्या भूमिका घेता आणि काश्मिरची जनता रोज तिथे मरते आहे. हे चालणार नाही,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

“कलम ३७० रद्द झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली की नाही हे आता सांगता येणार नाही. तिथल्या परिस्थितीसंदर्भात बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. तिथे इंटरनेट बंद होतं. तिथे अनेक बंधने होती. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत आहे हे गृहमंत्र्यांनी समोर येऊन सांगावे”, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रंणांच्या धाडी सुरु आहेत याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले. “ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरला पाठवा. खूप शक्तिशाली लोक आहेत दहशतवादी पळून जातील. तुम्ही इथे आमच्या सरकारवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत आहात. तुम्ही या संस्था बदनाम केल्या आहेत. किरीट सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मिर फिरत बसतील. शरद पवारांविषयी चंद्रकांत पाटील यांनी ज्या शब्दामध्ये उल्लेख केला हे शोभते का? काश्मिरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोला. त्यांना दम द्या आम्हाला शहाणपणा शिकवू नका. महाविकास आघाडीतील नेत्यांनी नुसती खुर्च्यावर बसू नका,” असेही संजय राऊत यांनी म्हटले.

WhatsAppShare