“इस्रो वो है, जहा मुश्किले शर्मिंदा है”; सेहवागने जिंकली नेटकऱ्यांची मनं

151

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी)-  श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून २२ जुलै रोजी झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे भारतीयांचा थोडासा हिरमोड झाला. पण इस्रो च्या प्रयोगाचे आणि प्रयत्नांचे साऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने इस्रो च्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना सलाम केला.

ख्वाब अधूरा रहा पर हौसलें जिंदा है | इस्रो वो है, जहा मुश्किले शर्मिंदा है || हम होंगे कामयाब.. अशा शब्दात सेहवागने ट्विट केले. “स्वप्न जरी अपूर्ण राहिले असेल तरी आपण खचून जायचे नाही. आपल्यातील आशावाद कायम जिवंत ठेवला पाहिजे. आपण नक्कीच यशस्वी होऊ”, असे ट्विट करत सेहवागने इस्रो च्या कामगिरीचे कौतुक केले.

या मोहिमेबद्दल पंतप्रधान मोदी यांनीही इस्रो चे कौतुक केले. “चांद्रयान २ च्या संपूर्ण अभियाना दरम्यान देश अनेकदा आनंदित झाला. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो च्या प्रयत्नांचे कौतुक केले.