इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याचे मोदींना निमंत्रण ?  

129

इस्लामाबाद, दि. ३१ (पीसीबी) – तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान ११ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले जाऊ शकते, अशी चर्चा पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पाकिस्तानात २५ जुलैला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तेहरिक-ए-इन्साफ पक्षाला एकूण ११५ जागा मिळाल्या. या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांचे फोन करून अभिनंदन केले होते. तसेच   भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्याचे संकेतही इम्रान खान यांनी दिले आहेत. भारतासोबतच इतर सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तेहरिक-ए-इन्साफचे प्रवक्ते फवाद चौधरी म्हणाले की, मोदींनी खान यांना फोन करून अभिंदन करणे, हे एक चांगले पाऊल आहे. तेव्हा त्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्याचा विचार पक्ष समिती करत आहे. दरम्यान, २०१४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यास नरेंद्र मोदींनीही तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण दिले होते.