इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला आरक्षण द्यावे – रामदास आठवले

62

बारामती, दि. २ (पीसीबी) – दलित आणि सवर्णांमध्ये आरक्षणावरुन सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजासह  सर्वांना आरक्षण देण्यात यावे, अशी आपली भूमिका आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

आठवले बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आठवले म्हणाले की, शिक्षण व नोकरीच्या मुद्यावर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. दलित व मराठा समाजाने एकत्र येऊन हा प्रश्न निकालात काढला पाहिजे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता जितके आरक्षण शिल्लक आहे, त्यात ज्यांची मागणी आहे, अशा सर्वांनाच आरक्षण देण्यात यावे, असे आपले मत आहे, असे आठवले म्हणाले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येण्यास उशीर होत असल्याने  मराठा आरक्षणाबाबत अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे हा अहवाल लवकरात लवकर सादर करायला हवा, असेही आठवले म्हणाले.

संभाजी भिडे यांची विधाने समाजात तेढ निर्माण करणारी असल्याने त्यांच्या सभांसाठी चौकशी करूनच पोलिसांनी परवानगी द्यायला हवी. संविधानाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना विरोध केलाच पाहिजे, असेही आठवले म्हणाले. कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे गुरुजींना अटक करण्याची आमची मागणी आहे. मात्र, त्यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.