इंधन दरवाढ कायम; पेट्रोल ४८ तर डिझेल ५५ पैशांनी महागले

111

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – ऐन सणावाराच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम आहे.   आज (शुक्रवार) पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल ४८ पैशांनी तर डिझेल ५५ पैशांनी महाग झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोल ८७.३९ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ७६.५१ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. गुरूवारी पेट्रोलमध्ये १९ पैशांनी तर डिझेलमध्ये २१ पैशांनी वाढ झाली होती.  

१ सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर ८६.०९ रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर ८७.३९ रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या ७ दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात १ रुपये ३० पैशांची वाढ झाली आहे. महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती पहिल्या, सोलापूर आणि औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने १० सप्टेंबरला देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये विरोधीपक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनीदेखील सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.