इंधनाचे दर वाढण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा दोघेही जबाबदार – मायावती

106

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – वाढत्या इंधन दरांसाठी काँग्रेस आणि भाजपा दोघेही समान जबाबदार असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. काँग्रेसने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराविरोधात ‘भारत बंद’ ची हाक दिली होती. २१ विरोधी पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. दरम्यान मायावती यांनी भारत बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.

‘भाजपादेखील तेच चुकीचे आर्थिक धोरण स्विकारत आहे, जे काँग्रेसप्रणित युपीए-2 सरकारने तयार केले होते. चुकीच्या आर्थित धोरणामुळेच २०१४ मध्ये त्यांना सत्ता गमवावी लागली होती’, असे मायावती यांनी म्हटले आहे. वाढत्या इंधन दराविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला भाजपा आणि काँग्रेस दोघेही समान जबाबदार असल्याचेही मायावती यांनी म्हटले आहे.

‘युपीए-२ सरकारने २०१० मध्ये पेट्रोलच्या किंमतीवरील नियंत्रण उठवले होते, आणि हीच चूक एनडीए सरकारने केली असून त्यांनी १८ ऑक्टोबर २०१४ रोजी डिझेलच्या किंमतीवरील नियंत्रण उठवले. बहुमतासोबत सरकार स्थापन केल्यानंतर एनडीए सरकारने पेट्रोलवरील युपीए सरकारची योजना तशीच लागू ठेवली नाही तर डिझेलवरील नियंत्रणही उठवले, यामुळे महागाई वाढली’, असे मायावती यांनी म्हटले आहे. जर सरकारची इच्छा असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर नियंत्रण आणू शकतात असे मायावती बोलल्या आहेत.