इंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच – देवेंद्र फडणवीस

76

मुंबई,दि.१९(पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. आधी पंधरा वर्षे ज्यांचं सरकार होतं ते एक इंचही जागा मिळवू शकले नाहीत असं मत माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जागा मिळाली त्यावेळी भूमिपूजनही झालं होतं. तरीही आज इंदू मिल या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित करणं, लगेच तो रद्द करणं हे सगळं अनाकलनीय आहे. काहीही करायचं असेल तर लपूनछपून करु नका राजरोसपणे करा असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

दरम्यान इंदू मिल या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी काही मोजक्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र काही वेळातच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. ज्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन कुणीही राजकारण करु नये. येत्या काही दिवसांत सर्वांच्या सहभागाने पायाभरणी होणार असल्याचं स्पष्ट केलं.

WhatsAppShare