इंदापुरातून हर्षवर्धन पाटीलच निवडणूक लढवणार – अशोक चव्हाण

341

पुणे, दि. ५ (पीसीबी) –  आगामी निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेच असतील, असे जाहीर करून शंकरराव पाटील आणि शंकरराव चव्हाण यांचे नाते आपल्या सर्वांना माहित आहे. तुमच्या मनात आहे ते आमच्याही मनात आहे. आघाडीची चर्चा होईल तेव्हा मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी याबाबत बोलणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज (बुधवार) इंदापुरात दाखल झाली. यावेळी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांनी महत्त्वाची घोषणा केली. आगामी निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलच असतील, असे सर्व नेत्यांनी जाहीर केले.

हर्षवर्धन पाटील आगे बढो”, अशी घोषणाही अशोक चव्हाण यांनी केली. हर्षवर्धन पाटील यांचा स्कोअर चांगला राहणार आहे. स्कोअर वाढवायला धोनी, विराट कोहली यांची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रात स्कोअर वाढवण्यासाठी हर्षवर्धन पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, इंदापूरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच या जागेचा मुद्दा समोर आला. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  म्हणाले होते की, वाट्टेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीला देणार, भले आघाडी झाली नाही तरी बेहत्तर,” अशा शब्दात त्यांनी इंदापूर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा केला होता. आता चव्हाण यांनी हर्षवर्धन यांची इंदापुरातून उमेदवारी जाहीर केल्याने अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.