इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव

108

बर्मिंगहॅम, दि. ४ (पीसीबी) – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला . विराट कोहलीचे अर्धशतक विजयापर्यंत संघाला पोहचवू शकले नाही. तो बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी गडगडली. मोहम्मद शमी, इशांत शर्मा असे गडी बाद होत गेले आणि भारताचा डाव १६२ धावांत गुंडाळला. या विजयामुळे पाच कसोटी मलिकेत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळाली.    

आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी ८४ धावांची आवश्यकता होती. मात्र, सामना सुरू होताच दिनेश कार्तिकला पहिल्याच षटकात अँडरसनने बाद केले आणि तिथून भारताची गळती  सुरू झाली. कर्णधार विराट कोहलीने सामना सावरण्याचा प्रयत्न केला. विराटने  संयमी खेळ करत  अर्धशतक पूर्ण केले. पण तो ५१ धावांवर खेळत असताना गोलंदाज बेन स्टोक्सने त्याला पायचीत करून तंबुत धाडले.

विराटपाठोपाठ मोहम्मद शमीदेखील बाद झाला. त्याचा बळीही बेन स्टोक्सनेच घेतला आणि भारताचा विजय  दुरापास्त झाला. त्यानंतर इशांत शर्माही पायचीत झाला. हार्दिक पंड्या याच्याकडून अपेक्षा असताना तोही झेलबाद झाला आणि भारताचा डाव १६२ धावांमध्ये संपुष्टात आला.