आसीसीच्या अजब-गजब नियमांबद्दल रोहितने व्यक्त केली नाराजी, म्हणाला…

131

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – यजमान इंग्लंड विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थरारक पद्धतीने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

या सामन्यात शेवटच्या षटकात सीमारेषेवरून फेकण्यात आलेला चेंडू धाव घेणाऱ्या फलंदाजांच्या बॅटला अनावधानाने लागून चौकार गेला आणि ओव्हरथ्रोच्या ४ अतिरिक्त धावा मिळाल्या. याशिवाय मूळ सामना आणि सुपर ओव्हरचा सामना अनिर्णित राहिल्याने सामन्यात सर्वाधिक चौकार षटकारांची आतषबाजी करणाऱ्या इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. यावरून क्रिकेट जाणकारांनी आणि चाहत्यांनी आसीसी च्या नियमावलीवर टीकेची झोड उठवली. त्यातच भारताचा हिटमॅन रोहित शर्मा यानेदेखील या नियमांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि काही नियम हे खरंच बदलणे गरजेचे असल्याचे ट्विट केले.

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.