आसाममधील ४० लाख नागरिकांकडे भारतीय नागरिकत्व नाही   

155

दिसपूर, दि. ३० (पीसीबी) – आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनचा (एनआरसी ) दुसरा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे.  त्यानुसार तब्बल ४० लाख लोकांना आसामचे नागरिकत्व सिद्ध करता आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

या अहवालानुसार आसामचे २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६६८ भारतीय आहेत.  आसामची एकूण लोकसंख्या ३ कोटी २९ लाख इतकी आहे. मात्र आता ४० लाख नागरिकांना आसाममधील आपले नागरिकत्व सिद्ध करता आलेले नाही. मात्र, त्यांना ते सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात येणार आहे.

एनआरसी ची पहिली यादी ३१ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिध्द  करण्यात आली होती. पहिल्या यादीत आसामच्या ३.२९ कोटी लोकसंख्येपैकी १.९० कोटी नागरिकांना स्थान मिळाले होते. जे नागरिक २५ मार्च १९७१ पासून आसाममध्ये राहतात. त्यांचा या यादीमध्ये सरसकट समावेश करण्यात आला  आहे.

आसाममध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या विरोधात एक मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी २०१५ पासून अशा बेकायदा राहणाऱ्यांची माहिती मिळवली जात आहे. आसाममध्ये लाखो लोकांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे मूळचे आसामी कोण आणि बाहेरचे कोण याबाबत नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन शोध घेत आहे.