आषाढी वारीत उत्तम दर्जाची आरोग्य व वैद्यकीय सुविधा पुरवा; सागर हिंगणे यांची मागणी

75

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – आषाढी वारीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी महापालिकेमार्फत उत्तम दर्जाची आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा पुरवावी, अशी मागणी प्रभाग स्वीकृत सदस्य सागर हिंगणे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात प्रभाग स्वीकृत सदस्य सागर हिंगणे यांनी महापौर काळजे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “जुलै महिन्यात आषाढी वारीला सुरूवात होणार आहे. त्यानिमित्त देहू आणि आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रावर देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी दाखल होणार आहेत. या वारकऱ्यांची सेवा करणे हे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येकाचे आणि महापालिकेचे कर्तव्य आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठल भक्तीच असते. या सेवेबरोबरच वारकऱ्यांना उत्तम दर्जाची आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा पुरविणे हेही महापालिकेचे काम आहे. त्यामुळे वारकऱ्यांना आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा उत्तम दर्जाची पुरविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

महापौरांना निवेदन देताना विजय जाधव, सोहम बोराटे आदी उपस्थित होते.