आशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक

20

जकार्ता, दि. २० (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारताच्या नेमबाजांनी दिमाखदार कामगिरी करत पदकांची मालिका सुरुच ठेवली आहे. १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दीपक कुमारने रौप्यपदक पटकावले आहे.

दीपककुमारने २४७.१ गुणांची नोंद करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. दीपकने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत पदक मिळवले आहे.  पात्रता फेरीत भारताच्या रवी कुमार आणि दीपककुमार यांनी चांगला खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्या दिवशी कांस्यपदक मिळवलेल्या रवी कुमारनेही आपले आव्हान कायम ठेवले होते. मात्र, अखेरच्या क्षणी अपेक्षित कामगिरी करता न आल्याने रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

दुसरीकडे दीपक कुमारचे सामन्यावरील वर्चस्व कमी होत होते. मात्र, अत्यंत संयमी खेळ करत दीपकने रौप्यपदक पटकावले. स्पर्धेत सुवर्ण पदक चीनच्या यांग हाओराने जिंकले, तर कांस्य पदक शाओचुआन पटकावले.