आशियाई क्रीडा स्पर्धा; भारताचा बॉक्सर अमित पांघलचा ‘सुवर्ण’ठोसा

86

जकार्ता, दि. १ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अखेरच्या दिवशी  ४९ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित पांघलने अंतिम फेरीत उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा पराभव करुन सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला आहे.

जागतिक क्रमवारी आणि अनुभवामध्ये हसनबॉय हा अमितपेक्षा कित्येकपटीने सरस खेळाडू होता, मात्र अमितने अंतिम सामन्यात हसनबॉयला आश्चर्यचकीत करुन टाकले. पहिल्या डावात हसनबॉय अमितवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अमितने बचावात्मक पवित्रा घेतला. यामुळे हसनबॉयला गुण कमावता आले नाहीत. मात्र मधल्या वेळेत अमित संधी साधत हसनबॉय चांगले प्रहार केले.

दुसऱ्या डावात अमितच्या आक्रमक खेळामुळे हसनबॉय थोडासा दडपणाखाली आलेला पहायला मिळाला. याचा फायदा घेत अमितने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. तिसऱ्या सत्रात बचाव आणि आक्रमणाचा सुरेख मेळ साधत अमितने सामन्यात बाजी मारत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर टाकली.