आशियाई क्रीडा स्पर्धा; पी व्ही सिंधू रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू!

64

जकार्ता, दि. २८ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पीव्ही सिंधूचा चायनीज तैपेईच्या ताई झऊ यिंग हिने सरळ लढतीमध्ये पराभव केला. परंतु तरीही सिंधूने इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या बॅडमिंटनच्या ५६ वर्षांच्या इतिहासात रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.  

सिंधूने पहिला गेम १३-२१ असा गमावला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आले नाही. या गेममध्ये सिंधूला १६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.

ताई झू यिंगने पहिला गेम सहज जिंकला. हा गेम तिने २१-१३ अशा फरकाने जिंकला. यिंगने सामन्यात सुरुवातीपासूने वर्चस्व प्रस्थापित केले होते, ज्याचा फायदा तिला झाला. यावेळी सिंधूने नेटवर फार चुका केल्या. परिणामी प्रतिस्पर्धी खेळाडूला सहजरित्या आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहला गेम १६ मिनिटांत संपला.

दुसऱ्या गेममध्ये पीव्ही सिंधूने आक्रमक सुरुवात केली. एक वेळ अशी होती की, दोन्ही खेळाडू ४-४ अशा बरोबरीत होत्या. मात्र, यिंगने कमबॅक करत ब्रेकपर्यंत ७-११ अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूने प्रतिहल्ला करत काही पॉईंट्स घेतले. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. १८ मिनिटांच्या या गेममध्ये सिंधूला  १६-२१ असा पराभव स्वीकारावा लागल्याने अखेर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.