आळंदीत वडापमधून प्रवास करणाऱ्या महिलेवर बलात्कार

3702

आळंदी, दि. १६ (पीसीबी) – एका ३२ वर्षीय प्रवासी महिलेला चाकूचा धाक दाखवून ओमिनी कारचालकाने निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास आळंदी फाट्याजवळील तळ्याशेजारी घडली.

याप्रकरणी पीडित ३२ वर्षीय महिलेने चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार वडाप कारचालक मंगेश आगळे (वय ३०) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय महिला या बुधवारी भाम येथील टाटा कंपनीमध्ये काम पाहण्यासाठी वडापाच्या ओमिनी कारने गेल्या होत्या. काम पाहून झाल्यावर त्यांना तीच वडापची ओमिनी कार पुन्हा टाटा कंपनीच्या बाहेर पॅसेंजर भरताना दिसली. यामुळे पीडित महिलेने  मोशीला जाणार का असे विचारुन ड्रायव्हर शेजारील सीटवर बसल्या. प्रवासा दरम्यान महिलेची कार चालक मंगेश याच्यासोबत ओळख झाली. त्याने त्याचा मोबाईल नंबर पीडित महिलेला दिला. काही वेळाने कार चाकण चौकात आली असता सर्व पॅसेंजर उतरले. पीडित महिलेला मोशी येथे जायचे होते. मात्र चाकण चौकात ट्रॅफिक असल्याचे कारण देत आरोपी आगळे याने आपण आळंदी मार्गे मोशीला जाऊ असे सांगून आळंदी फाट्यावरुन गाडी एका निर्जन तळ्याशेजारी नेली. हे पाहून पीडित तरुणीने आरडाओरड करुन कार थांबवण्या सांगितली. मात्र आरोपी आगळे याने त्याच्या जवळील चाकू पीडित महिलेच्या पोटाला लावला आणि पोटाला जखम करुन गप्प रहा नाहीतर मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच महिलेला कारच्या बाहेर काढून तिच्यावर बलात्कार करुन कारसह पसार झाला. पोलिसांनी आरोपी ओमिनी कारचालक मंगेश आगळे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिस अधिक तपास करत आहेत.