आळंदीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पावनेसहा लाखांचा ३७ किलो गांजा जप्त

89

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून पेट्रोलिंग सुरु असताना पुणे-आळंदी रस्त्यावर असलेल्या जुन्या दिघी जकात नाक्याजवळ रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून तब्बल ५ लाख ५७ हजार रुपयांचा ३७ किलो १४० ग्राम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि. ८) दुपारी साडेतीनच्या सुमारास करण्यात आली.

रमेश सोपान जाधव (वय ३२, रा. केळगाव, आळंदी, मु.गाव.चिंचपुर, ता.परांडा, जि.उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली (एम.एच.१२/जी.के.९७२१) या क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील राज्यातून गांजा आणून शहर परिसरात विकला जातो. यावर आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून पेट्रोलिंग वाढवून त्यांची धरपकड सुरु केली होती. रविवारी (दि.८) दुपारी साडेतीनच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथक दिघी पोलिसांच्या स्टॉफसह पुणे-आळंदी रस्त्यावर जुन्या दिघी जकात नाक्याजवळ पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्या ठिकाणी (एम.एच.१२/जी.के.९७२१) या क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारमध्ये रमेश जाधव हा संशयीतरित्या हालचाल करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी रमेश जाधव यांची चौकशी केली तसेच त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कारची झडती घेतली असता त्यामध्ये तीन बॅगांमध्ये लपवून ठेवण्यात आलेला ५ लाख ५७ हजार रुपयांचा ३७ किलो १४० ग्राम गांजा जप्त केला. तसेच त्याच्या ताब्यातील कार देखील जप्त करण्यात आली.

दरम्यान, रमेश जाधव हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गांजा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी टोके अधिक तपास करत आहेत.