आळंदीत प्लॉटिंग व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण

180

आळंदी, दि. १४ (पीसीबी) – प्लॉटिंगच्या व्यावसायातून बक्कळ पैसा कमवल्याचा समज करुन घेत तिघांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. तसेच त्याला घरच्यांसमोर मारहाण करत दोन लाखांची खंडणीसाठी धमकावले. ही घटना गुरुवारी (दि. १३) आळंदीतील चिंबळी येथे घडली.

याप्रकरणी प्रशांत हनुमंत बनकर (वय २५, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम जैद, गौरव भूमकर आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत शेती आणि प्लॉटिंगचा व्यवसाय करतात. गुरुवारी आरोपींनी चिंबळी गावातून प्रशांत यांचे (एमएच/१४/जीएन/०८४१) या क्रमांकाच्या कारमधून अपहरण केले. तसेच आरोपींनी जबरदस्तीने प्रशांत यांना त्यांच्या घरी नेले. दरम्यान, आरोपींनी ‘तुझा प्लॉटिंगचा व्यवसाय जोरात चालेल आहे. आम्हाला आत्ताच्या आत्ता दोन लाख रुपये पाहिजेत’ असे म्हणत पैशांची मागणी केली. यासाठी प्रशांत यांनी नकार दिला असता आरोपींनी प्रशांत यांना त्यांच्या आई, वडील आणि भावासमोर दांडक्याने आणि लोखंडी पट्टीने मारहाण केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.