आळंदीत चिमुकल्याने गिळलेला रिमोटचा सेल पोटातच फुटला

36

आळंदी, दि. २३ (पीसीबी) – चिमुकल्याने रिमोटचे बटन सेल गिळल्याची आणि तो पोटात फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  ही घटना आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास आळंदी येथे घडली.

हुजैफ तांबोळी असे या चिमुकल्याचे नाव आहे. हुजैफला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

आळंदी येथे तांबोळी कुटुंबीय राहते. आज (शनिवारी) सकाळी कुटुंबीयांच्या आधी हुजैफ झोपेतून जागा झाला. खेळता खेळता टेबलवर ठेवलेला रिमोट त्याने घेतला. तो काही वेळा आपटला. त्यातून बटन सेल बाहेर आला. त्या आवाजाने सगळे जागे झाले, पण तोपर्यंत हुजैफने सेल गिळले होते. ही बाब लक्षात येताच रुग्णालयात धाव घेण्यात आली. दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करुन सेल बाहेर काढण्यात आला.