आर्यन खान प्रकरणाला आणखी एक वळण; समीर वानखेडेंसह सहा जणांवर खंडणी वसुली आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार

84

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : आर्यन खान प्रकरणाला रोज नवीन वळण मिळताना दिसत आहे. आता ज्येष्ठ वकील कनिष्ठ जयंत यांनी थेट समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जयंत यांनी तसा तक्रार अर्जच पोलिसांना दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अॅड. कनिष्ठ जयंत यांनी मीडियाला ही माहिती दिली आहे. आर्यन खान क्रुझ प्रकरणातील मी एक तक्रारदार आहे. 12 आणि 16 ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात केपी गोसावी, मनिष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात मी तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटीतपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचं अपहरण केलं आणि कोट्यावधी रुपयांची खंडणी त्याच्या सुपरस्टार वडिलांकडून मागितली. अशा स्वरुपाची लेखी तक्रार अर्ज मी दाखल केला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची या सर्व प्रकरणात भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे. एका प्रकारे फिल्म इंडस्ट्रिजवर दबाव आणण्यासाठी अधिकाराचा गैरवापर करण्यात आला आहे, अशा स्वरुपाची तक्रार करण्यात आल्याचं जयंत यांनी सांगितलं.
माता रमाबाई पोलिस ठाणे, यलोगेट पोलिस ठाणे व स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे समीर वानखडेसह अन्य जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी एक व्हिडीओ जारी करून या प्रकरणाची पोलखोल केली आहे. समीर वानखेडे, किरण गोसावींवर साईल यांनी खंडणीचे आरोप केले आहेत. या व्हिडीओत कुणाला किती रक्कम मिळणार होती याची डिटेल्सही देण्यात आली आहे. यावरून समीर वानखेडे खंडणी वसुलीचं रॅकेट चालवत असल्याचं स्पष्ट होत आहे, असं जयंत यांनी म्हटलं आहे.

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

WhatsAppShare