आर्थर रोड कारागृहात विजय मल्ल्याला वेस्टर्न पद्धतीच्या टॉयलेटची सुविधा

1147

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात  पसार झालेल्या विजय मल्ल्याला आर्थर रोड कारागृहात वेगळ्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी मल्ल्याला वेस्टर्न पद्धतीच्या टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच स्वच्छतेची ही काळजी घेण्यात येईल, असे भारत सरकारने लंडन न्यायालयाला सांगितले आहे.   

दरम्यान, विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली करून आर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवण्याची मागणी केली आहे. विजय मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार न्यायालयात केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला. यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. याप्रकऱणी पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला होणार आहे.

यापूर्वी न्यायाधीशांनी आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये नैसर्गिक उजेड आणि वैद्यकीय सुविधेवरुन चिंता व्यक्त केली होती. विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण केल्यास त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवले जाणार आहे. भारताने न्यायालयाकडे कारागृहाचे फोटो पाठवले होते. मात्र, त्यावरुन अंदाज बांधता येऊ शकत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी व्हिडीओ मागितला आहे.