आर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवा; मल्ल्याच्या प्रत्यार्पणापूर्वी लंडनच्या न्यायालयाची मागणी

97

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली करून आर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवण्याची मागणी केली आहे. विजय मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार न्यायालयात केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला. यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. याप्रकऱणी पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला होणार आहे.

यापूर्वी न्यायाधीशांनी आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये नैसर्गिक उजेड आणि वैद्यकीय सुविधेवरुन चिंता व्यक्त केली होती. विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण केल्यास त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवले जाणार आहे. भारताने न्यायालयाकडे कारागृहाचे फोटो पाठवले होते. मात्र, त्यावरुन अंदाज बांधता येऊ शकत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी व्हिडीओ मागितला आहे.

‘तुम्ही दुपारी व्हिडीओ शूट करु शकता का ? मला नैसर्गिक उजेड, सुर्यप्रकाश पहायचा आहे. खिडकीतून प्रकाश येतो की नाही याची खात्री करायची आहे’, असे न्यायाधीशांनी सांगितले आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयामध्ये दिली होती. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे.