आरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना

254

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – ‘एरवी प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सरकार पुढे असते. तसे त्यांनी कालच्या बंदचे, दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यावे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा,’ असा उपरोधिक  सल्ला शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’मधून भाजप सरकारला दिला आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनावरून भाजपवर हल्ला चढवला. ‘एरवी सर्वच प्रकरणांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘सब कुछ मैं’च्या भूमिकेत असतात. पण मागील चोवीस तासांत ते कोठे होते? त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले, हे महाराष्ट्राला कळायला हवे,’ अशी मागणी करतानाच ‘फडणवीस यांनी आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

परळीमध्ये आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निवेदन काढले असते. तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान झाले असते ना नंतरचा आगडोंब उसळला असता,’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.