आरक्षणासाठी धनगर समाज तीव्र लढा उभारणार – प्रकाश शेंडगे  

100

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याची मानसिकता नाही. हे सरकारच्या मागील चार वर्षांच्या कारभारातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे धनगर समाज आज (मंगळवार) पासून तीव्र लढा उभारणार आहे, असे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज येथे सांगितले. या लढ्यादरम्यान कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेंडगे बोलत होते. यावेळी धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे, आमदार रामहरी रूपनवर, राम वडकुते, दत्ता भरणे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकते आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेंडगे म्हणाले की, भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आश्वासन तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी लेखी पत्राद्वारे दिले होते. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांना धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत साधा ‘ध’ देखील काढलेला नाही, अशी खंत व्यक्त करून या सरकारविरोधात तीव्र लढा उभारण्याचा पवित्रा घेतल्याचे शेंडगे यांनी सांगितले.  आजपर्यंत आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.