आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीवही घेतील – खासदार उदयनराजे भोसले

288

पुणे, दि. ५ (पीसीबी) –  आज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. आरक्षणावर तातडीने तोडगा काढा, अन्यथा आणखी उद्रेक होऊ शकतो, असा सुचक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) येथे दिला. आंदोलकांनी शांततापूर्ण आंदोलन करावे, आत्महत्येचे प्रयत्न करू नयेत. ९ ऑगस्टचे आंदोलन शांततेत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील समन्वयकांची बैठक उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात झाली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला राज्यातील समन्वयकांना येण्याची विनंती केली होती. समन्वयकांनी आपल्या मागण्या, सूचना याविषयी चर्चा केली, या सूचनांचे संकलन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

आरक्षण मागणारे ८० टक्के शेतकरी मराठा समाजातील आहेत. तर झोपडपट्टीत ४५ टक्के लोक मराठा समाजाचे आहेत. आमदार, खासदारांना महाराष्ट्रातील लोकांनी निवडून दिलेले आहे. इतर जातींना न्याय दिला तसा न्याय मराठा समाजाला मिळावा इतकीच माफक अपेक्षा आहे. लोकशाहीत स्वत:च्या अधिकारासाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे. कायद्याचे कारण पुढे करून आरक्षणाचा प्रश्न रखडत ठेवू नका, सर्वानुमते मार्ग काढा,’ असे आवाहन समन्वयकांनी  केले.