“आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय; मात्र, आज पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली”

60

पुणे, दि.२२ (पीसीबी) : आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय आहे. पण आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली. आज बऱ्याच महिन्यानंतर नाट्यगृह सुरु झाले आहेत. कोरोनाने लोकांमध्ये निराशा आली होती. निसर्गापुढे कुणाचं चालत नसतं. पण आता तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार करु, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आजपासून नाट्यगृह सुरु झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. सकाळी 8 वाजता अजित पवार यांचं बालगंधर्व रंगमंदिरात आगमन झालं. अजित पवारांचा नाट्य परिषद आणि कलाकारांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. शिंदेशाही पगडी घालून आणि तलवार देऊन अजितदादांचा सन्मान करण्यात आला. मंचावर विविध पक्षाचे राजकीय नेते, नाट्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर केलेल्या भाषणात अजित पवार म्हणाले, “उपस्थित सर्व कलाकार बंधु भगिनींनो, आज वेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलोय. निसर्गापुढे काही चालत नाही, 19 महिने हे सगळं बंद होतं, कलाकार सारखे भेटायचे, नाट्यगृह कधी सुरु होणार म्हणून प्रश्न विचारायचे, पण आज अखेर आपण नाट्यगृह सुरु करण्याला परवानगी दिलेली आहे. आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय आहे मात्र मी पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली”

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “आताही सगळे कलाकार विचारतायेत की पूर्ण क्षमतेने नाट्यगृह कधी सुरु करणार… मी आपल्याला सांगू इच्छितो, दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याबाबत विचार करतोय. तिसरी लाट येऊ नये म्हणून आपणा सर्वांना निश्चित खबरदारी घ्यावी लागेल. आम्हाला बंद करायला आवडत नाही मात्र खबरदारी घेतली पाहिजे”

दिवाळीनंतर पूर्ण क्षमेतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार आहे. कलाकारांनी दिवाळीनंतर भेटावं. मी पुण्याच्या महापौरांना भेटेन, याबाबत चर्चा करेन. जर परिस्थित चांगली असेल, कोरोनाचा धोका नसेल तर नाट्यगृह 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याला आम्ही परवानगी देणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. 56 हजार कलावंतांची यादी आमच्याकडे आलीये. त्यांना प्रत्येकी 5 हजार देण्याचा आम्ही निर्णय घेतला. याची जबाबदारी मंत्री अमित देशमुख यांच्याकडे आहे. मी ही जातीने लक्ष देतोय. आम्ही तुमच्या अडचणी दूर करायला सोबत आहोत, असंही अजित पवार म्हणाले.

बालगंधर्व पुनर्विकासावर बोलताना अजित पवार म्हणाले, बालगंधर्वचा विकास करायला दोन मतप्रवाह आहेत. त्याचाही विचार करावा लागेल. कलाकारांचाही विचार बांधकाम करताना घ्यावा लागेल, मी महापौरांना सूचना देईन आणि आयुक्तांना सूचना देईन. आधीच 17 महिने बंद होतं. याचा प्लॅन बघावा लागेल आणि सुरक्षिततेचा विचार करावा लागेल.

यशवंतराव चव्हाणांपासून सांस्कृतिक परंपरा जपली, शरद पवारांनी ही जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या क्षेत्राला भरभरून मदत दिली. अजून मदत करायला हवी याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कोल्हापूर चित्रनगरीत आणि मुंबई फिल्म सिटीत सुविधा देण्याचा विचार आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

WhatsAppShare