आम्हाला दलित मत मिळवण्यासाठी दलित नेत्यांची गरज नाही; खासदार इम्तियाज जलील यांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टिका

268

औरंगाबाद, दि. ११ (पीसीबी) – वंचित सोबत तुटलेल्या युतीनंतर एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांचा सुर बदललेला पहायला मिळत आहे. त्यांनी आता थेट प्रकाश आंबेडकरांना टारगेट करत, आम्हाला दलित मत मिळवण्यासाठी दलित नेत्यांची गरज नाही, अशी बोचरी टिका केली आहे. तसेच दलितांची मते वंचितची मक्तेदारी नाही असा टोला देखील जलील यांनी लगावला आहे.

वंचितसोबतची आघाडी तुटल्यानंतर आजपासून औरंगाबादेत एमआयएमकडून इच्छुकाच्या मुलाखतीला सुरूवात झाली, यावेळी जलील बोलत होते.

नांदेड, मालेगाव आणि पुण्यातील वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती जलील यांनी घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, वंचित सोबत आघाडी तुटली म्हणजे दलित मत आम्हाला मिळणार नाही असे जे बोलले जाते, त्यात काही तथ्य नाही. ओवेसी साहेब खासदार आणि मी आमदार झालो तेव्हा ते सिध्द देखील झाले आहे. पण आता वंचितसोबतची आघाडी तुटल्यामुळे आमच्या पक्षाला दलितांची मते मिळणार की नाही? यावर कथ्याकुट सुरू झाला आहे. मुळात दलित समाजाची मते मिळवण्यासाठी आम्हाला दलित नेत्याची गरज नाही. दलित समाज मोठ्या प्रमाणत एमआयएम बरोबर होता, आहे आणि यापुढे देखील राहील. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते स्पष्ट होईल.

WhatsAppShare