आमदार होण्यासाठी ‘वर्षा’वरील नव्हे, राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद हवा – मुंडेंचा क्षीरसागरांना टोला

1438

बीड, दि. १५ (पीसीबी) – बीडचा आमदार व्हायचे असेल, तर ‘वर्षा’वरील गणपतीचा नाही, तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळायला हवा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.  

जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावर बोलताना मुंडे यांनी क्षीरसागर यांना टोला लगावला आहे. बीडमध्ये  आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या  पदाधिकाऱ्यांचा  मेळावा  झाला. यावेळी मुंडे बोलत होता.

क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या  घरातील गणपतीचे १० दिवस  आशीर्वाद घेतले, तरी त्यापेक्षा राजुरीचा आशीर्वाद  महत्वाचा  आहे, असेही मुंडे यावेळी म्हणाले.  दरम्यान, बीड विधानसभा  मतदार  संघात संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या विरुद्ध  जयदत्त  क्षीरसागर लढत देऊ शकतात. त्यामुळे  चुलत्या-पुतण्यांच्या या लढाईमध्ये  कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आतापासून लागून राहिली आहे.