आमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द

468

औरंगाबाद,  दि. २० (पीसीबी) – येत्या २० नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून   मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.  त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याचा आता आपला कोणताही विचार  नाही. तसेच कार्यकर्त्यांनीही आग्रह केल्याने पक्ष काढण्याचा आपला निर्णय रद्द करत आहे, असे  शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे हाच पक्ष काढण्यामागे हेतू होता. मात्र, आता  आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार असेल, तर मी देखील राजकीय पक्ष काढण्याचा विचार सोडून देईन,  असे जाधव यांनी सांगितले. १५ नोव्हेंबरपर्यंत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधीमंडळाचे अधिवेशन बोलवून २० नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा कायदा केला जाईल,  असे  मुख्यमंत्र्यांनी म्हटले  असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून समाजात बिघडत चाललेल्या परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत दिली होती. येत्या २७ ऑगस्टला  मुंबईमध्ये  राजकीय पक्ष  काढण्यासंदर्भात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर लगेचच राजकीय पक्षाची घोषणा करण्यात येईल, असे ते म्हणाले होते.