आमदार लक्ष्मण भाऊंना आठवड्यात डिस्चार्ज मिळणार

225

– खुर्चीत बसतात आणि तिथल्या तिथे चालतात

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या महिन्यापासून बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज आली आहे. अमेरिकेहून खास मागविलेल्या इंजेक्शनमुळे कार्यकर्त्यांचे भाऊ आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आता ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले आहेत. शंकर जगताप पीसीबी टुडेशी बोलताना म्हणाले, भाऊ आता खुर्चीत बसतात, तिथल्या तिथे चालतात. आठवड्यात त्यांना रुममध्ये शिफ्ट करणार आहेत आणि कदाचित नंतर घरी सोडतील.

प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने आमदार जगतापांना आठवड्याभरात रुग्णालयातून घरी सोडले जाऊ शकते, असे शंकर जगताप यांनी सांगितले. तर, जगताप आता लिक्वीड डायट घेऊ लागले आहेत, असे त्यांचे दुसरे बंधू विजय जगताप म्हणाले. अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे बंधूंच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. कालच जगतापांना या इंजेक्शनचा आणखी एक डोस देण्यात आला. ते गेल्या महिन्याच्या १२ तारखेपासून रुग्णालयात दाखल आहेत. वीस एप्रिलला त्यांचा व्हेंटीलेटर काढल्याने त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला होता. तर, आता त्यांना त्यांचे भाऊ हे बेडवरून उठून खुर्चीत बसू लागल्याने तसेच काही पावले चालूही लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याची खुषखबर त्यांचे बंधू व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या कोथरुड, पुणे येथील निवासस्थानी जाऊन दुपारी एक वाजता दिली. यावेळी त्यांच्यात तास, दीडतास चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक नियोजन व तयारीवर यावेळी विचारविनीमय झाला.

निवडणूक तयारीला लागा, असा आदेश प्रदेशाध्यक्षांनी यावेळी जगतापांना दिला, असे खर्डेकर यांनी या भेटीनंतर सांगितले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व जागी पक्षाचे नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी काय करावे लागेल, यावर यावेळी खल झाला, असे ते म्हणाले. शहरातील प्रलंबित कामांबाबतही यावेळी चर्चा झाली. जोरात कामाला लागा, पक्ष पाठीशी आहे, असे पाटील यांनी यावेळी जगतापांना आश्वस्त केल्याचेही खर्डेकर यांनी सांगितले.