आमदार लक्ष्मण जगताप लोकसभा लढण्याची शक्यता; चिंचवड मतदारसंघाच्या राजकारणात गुंतागुंत वाढली

31

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप मावळ लोकसभा मतदारसंघातून पुन्हा रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असणार?, याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघावर विरोधकांच्या तुलनेत आमदार लक्ष्मण जगताप यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे जगताप हे खासदार झाल्यास ते सुचवतील तोच या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल, असा कयास बांधला जात आहे. स्वतः जगताप हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसणे विरोधकांसाठी फायद्याचे ठरण्याची शक्यता आहे. सध्या तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकारण गुंतागुंतीचे बनले असून, लोकसभा निवडणुकीनंतरच या  मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवडच्या निम्म्याहून अधिक भागाचा समावेश होतो. चिंचवड आणि पिंपरी हे दोन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचा चांगला होल्ड आहे. विशेषतः ते स्वतः लोकप्रतिनिधित्व करत असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघावर त्यांनी मजबूत राजकीय पकड निर्माण केली आहे. या मतदारसंघात आमदार जगताप यांच्या विरोधकांचे अस्तित्व शोधावे लागेल, अशी स्थिती आहे. आमदार जगताप यांना विधानसभेला पराभूत करण्याची ना राष्ट्रवादीत ताकद आहे ना शिवसेनेत आहे. परंतु, आमदार जगताप मावळ मतदारसंघातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्याच्या शक्यतेने चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राजकारण गुंतागुंतीचे बनले आहे.

आमदार जगताप आगामी लोकसभा निवडणुकीनंतर खासदार झाल्यास चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात उत्सुकताही निर्माण झाली आहे. आमदार जगताप हे खासदार झाले तरी ते नाव सुचवतील तोच चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असणार हे मात्र निश्चित आहे. चिंचवड मतदारसंघात भाजपच्या खालोखाल शिवसेनेची ताकद आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची ताकद आहे. या दोन्ही राजकीय पक्षांचा प्रमुख विरोधक आमदार जगताप हेच आहेत. त्यामुळे स्वतः आमदार जगताप हे विधानसभेच्या निवडणूक रिंगणात नसणे विरोधकांसाठी आगामी निवडणुकीत फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून नगरसेवक राहुल कलाटे हेच पुन्हा उमेदवार असण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत कलाटे यांनी दुसऱ्या क्रमांकाची चांगली मते घेतली होती. परंतु, आमदार जगताप यांना पडलेली मते आणि कलाटेंनी घेतलेल्या मतांमध्ये मोठा फरक राहिला आहे. त्यामुळे कलाटे यांना विजयापर्यंत जाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. शहरातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून चिंचवड मतदारसंघात भाजपला टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार सध्या तरी नाही. नगरसेवक नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर ही नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.

चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची म्हणजे बळीचा बकरा बनण्याचा प्रकार आहे. गेल्यावेळी नाना काटे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. भाऊसाहेब भोईर यांनी देखील काँग्रेसकडून चिंचवड मतदारसंघातील निवडणुकीचा अनुभव घेतला आहे. मोरेश्वर भोंडवे यांनी चिंचवड मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढविली होती. आता आगामी निवडणुकीत भोंडवे हे राष्ट्रवादीकडून बळीचा बकरा ठरतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.