आमदार लक्ष्मण जगताप ठणठणीत ,जुपिटर हॉस्पिटलमधून हात हलवत चाहत्यांना प्रतिसाद

285

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) -पिंपरी चिंचवडकरांचे लाडके आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती ठणठणीत होत असून लवकरच पुन्हा एकदा लोकांना भेटणार आहेत. बरोबर महिन्यापूर्वी आमदारांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांनी बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आले. पहिला आठवडा ते अत्यवस्थ होते. काही काळ त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आला होता. सर्व हालचाल मंदावल्याने सर्वांच्या जीवाला घोर लागला होता. त्यांच्या तब्बेतीचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी नेते प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, माजी मंत्री गिरीश महाजन आदींनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. भाऊंच्या अनेक समर्थकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी मोरया गोसावी मंदिरासह अनेक ठिकाणी होमहवन, यज्ञयाग केले त्याला अखेर यश आले. स्वतः अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेतून एक अत्यंत महत्वाचे इंजेक्शन मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.

त्या इंजेक्शनचे तीन डोस दिल्यानंतर पंधरा दिवसांत भाऊंच्या तब्बेतीत लक्षणीय फरक पडला. उपचाराला त्यांचे शरिर प्रतिसाद देत असल्याने नातेवाईक आणि हितचिंतकांचा उत्साह वाढला. आज सकाळी भाऊ थेट हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून बंद काचेच्या खिडकितून आपल्या चाहत्यांना हात करताना सर्वांनी सुस्कारा सोडला. मोरया पावला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कदाचित आठवडाभरात भाऊंना घरी सोडण्यात येईल, असे त्यांचे धाकटे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले.
महिन्यापूर्वी आमदार जगताप यांची तब्बेत खूपच ढासळली होती. तब्बेत सुधारत असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगत होते, पण उपचार कऱणाऱ्या डॉक्टरांनी माहिती देण्यास नकार दिल्याने जगताप यांचे चाहते संभ्रमात पडले होते. वास्तवात आमदार जगताप हे मृत्यूशी झुंज देत होते. तीस वर्षांच्या संघर्षमय राजकिय जीवनात भलेभले हल्ले परतवून लावणाऱ्या या योध्याने जीवाशी आलेले हं संकटसुध्दा परतवून लावले आहे. यमराजाशी दोन हात करुन यशस्वी मुद्रेने ते परतले आहेत. महापालिका निवढणुकिसाठी ढोल नगारे वाजत असताना ज्यांच्यामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता आली ते कर्तेकरवीते आमदार जगताप आजारी पडल्याने त्यांच्या समर्थकांची द्विधा मनस्थिती झाली होती. आज हॉस्पिटलच्या खिडकितून आमदारांनी सर्वांना हात हालवत, हसतमुखाने प्रतिसाद दिल्याने भाजपासह सर्व उच्छुकांचा उत्साह दुनावला आहे. आमदार जगताप यांच्याशिवाय भरभक्कम नेतृत्व नसल्याने भाजपाची गाळण उडाली होती, आता तेसुध्दा सावरले आहेत. आमदार जगताप यांना लवकर बरे वाटू दे यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रार्थना सुरू केली आहे.