आमदार लक्ष्मण जगतापांचे खासदार बारणेंना खुले आव्हान; थेरगावच्या बकालपणावरून बारणेंवर उपरोधिक टिका

4768

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) –  शिवसेना खासदार श्रीरंग बारणे व त्यांचे कुटुंबिय गेल्या २५ ते ३० वर्षांपासून थेरगाव परिसराचे लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. थेरगाव परिसराचा बकालपणा कोणी वाढविला आणि तेथील हप्तेवसुली कोण करत आहे?, याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे. या भागातील केवळ डांगे चौकाचा विचार केल्यास अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि रस्त्यावरच भरणारा बाजार यांमुळे तेथे प्रचंड वाहतूककोंडी होते. हे सर्व पाहिल्यास बारणे यांचे शहर नियोजनाबाबतचे किती दूरदृष्टीचे लोकप्रतिनिधीत्व आहे, हे सिद्ध होते. आपल्या परिसराचा विकास न करता निवडणूक जवळ आली की प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर मोघम आरोप करण्याची बारणे यांची जुनी सवय आहे. आता ते जनतेनेही ओळखले आहे. बारणे यांनी गेल्या साडेचार वर्षांत शहर विकासासाठी केंद्रांचा निधी आणण्याच्यादृष्टीने किती प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय असल्याची उपरोधिक टिका भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

खासदार बारणे यांनी गुरूवारी (दि. २४) पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपवर केलेल्या टिकेचा दुसऱ्या दिवशी आमदार लक्ष्मण जगताप यांनी खरपूस समाचार घेतला.

आमदार जगताप म्हणाले, “खासदार श्रीरंग बारणे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चार वेळा नगरसेवक होते. त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. काँग्रेस नंतर राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेस असा प्रवास करून ते शिवसेनेत गेले आणि मोदी लाटेमुळे खासदार झाले. त्यांचे बंधू देखील नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष होते. एवढेच नाही, तर त्यांचा पुतण्यादेखील दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. बारणे हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून थेरगाव परिसराचे लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. भाजपला नाकर्ते आणि निष्क्रिय म्हणणाऱ्या बारणे यांनी थेरगाव परिसराचा बकालपणा कोणी वाढविला आणि तेथील हप्ते कोण गोळा करत आहे?, याचे उत्तर आधी जनतेला द्यावे. या भागातील फक्त डांगे चौकाचा विचार केल्यास या चौकाच्या चारही बाजूंनी अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्या लावल्या जातात. तसेच येथे रस्त्यावरच बाजार भरतो. त्यामुळे या चौकात वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.

थेरगावच्या अन्य भागात डांगे चौकापेक्षाही भयानक अवस्था आहे. हे तेथील लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्याचा त्रासही तेथील जनतेला सोसावा लागत आहे. त्यामुळे शहर नियोजनाची दूरदृष्टी असलेल्या खासदार बारणे यांना ते स्वतः राहत असलेल्या परिसराचे सुनियोजन करण्यासाठी कोणीही रोखले नव्हते. परंतु, आपल्याच भागातील जनतेला होणारा त्रास खासदार बारणे यांना दिसत नाही. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत थेरगाव भागातील जनतेला वेगळा विचार करावा लागला. तेथील जनतेने बारणे यांचे लोकप्रतिनिधीत्व नाकारले. थेरगाव भागातील जनतेसाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात अनेक आरक्षणे आहेत. उद्यान, दवाखाना, मैदान, शाळा अशा अनेक सार्वजनिक प्रयोजनासाठी या आरक्षणांचा विकास करता येतो. बारणे यांनी किती आरक्षणे नागरिकांच्या हितासाठी विकसित केली, याबाबतही तेथील जनतेला स्वतः सांगणे जरुरीचे आहे. प्रत्यक्षात या आरक्षणांवर अतिक्रमणे होऊ दिली आणि नंतर त्याचे राजकारण करण्यातच बारणे यांनी धन्यता मानली, ही वस्तुस्थिती आहे.

स्वतः आणि आपले कुटुंबिय लोकप्रतिनिधीत्व करत असलेल्या भागाचा बकालपणा दूर करता येत नसेल, तर बारणे यांनी भाजपला नाकर्ते आणि निष्क्रिय म्हणणे म्हणजे एक मोठा राजकीय विनोदच आहे. बारणे यांनी केलेला हा विनोद शहरातील जनतेला चांगलाच कळला आहे. हीच जनता बारणे यांच्या टिकेला चोख उत्तर देतील. बारणे हे शहराच्या पाणी प्रश्नांवर बोलताना त्यातील काही मुद्दे झाकून ठेवत आहेत. पवना धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याच्या पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत ते काहीही बोलत नाहीत. या प्रकल्पाबाबत बारणे आणि शिवसेनेची भूमिका त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. तसे न करता ते शहराच्या पाणी प्रश्नांबाबत राजकारण करून आगामी निवडणुकीत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शहराचा मोठा भाग रेडझोनच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याचा अनेक नागरिकांना फटका बसत आहे. केंद्राशी निगडीत असलेला हा प्रश्न खरा तर खासदार बारणे यांनीच सोडविणे अपेक्षित आहे. परंतु, हा प्रश्नही त्यांना सोडवता येत नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

रेडझोनचा प्रश्न सोडवण्यापेक्षा उत्कृष्ट संसदपटू म्हणून मतदारसंघात मिरवण्यातच ते धन्यता मानत आहेत. खासदारकीच्या साडेचार वर्षांत बारणे यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी केंद्राचा किती निधी आणला, हा संशोधनाचा विषय आहे. उलट सत्ताधाऱ्यांवर मोघम आरोप करताना मात्र ते कधीही चुकत नाहीत. निवडणुका जवळ आल्या की सत्ताधाऱ्यांवर बेछूट मोघम आरोप करून स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याची बारणे यांची जुनी राजकीय सवय आहे. आगामी लोकसभा निवडणूक सात-आठ महिन्यांवर आली आहे. त्यामुळे बारणे आगामी निवडणुकीसाठी झोपेतून जागे झाले आहेत, हे सत्ताधारी भाजपवर केलेल्या टिकेवरून शहरातील जनतेने समजून घेतले आहे. अशा प्रकारे ते पुढील पाच-सहा महिने प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील. परंतु, शहरातील जनता बारणे यांना चांगली ओळखून आहे. पत्रकार परिषदा घेऊन “आरोप करा आणि प्रसिद्धी मिळवा” या बारणे यांच्या राजकीय तंत्रामुळे महापालिका निवडणुकीत भाजपचा फायदाच झाला.

शहरातील अतिक्रमणांचा विषय निश्चितच गंभीर आहे. त्याबाबत प्रशासन आपल्या स्तरावर वेळोवेळी दखल घेत असते. कारवाईही केली जाते. तरीही शहरातील अतिक्रमणांबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेत पुढे यावे. अतिक्रमणांबाबत काय धोरण असावे आणि कशी कारवाई व्हावी, हे त्यांनी सांगावे. त्यानुसार थेरगाव भागापासूनच अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासन ठोस कारवाईला सुरूवात करेल. नंतर ते शहराच्या प्रत्येक भागात राबवण्यात येईल. त्यामुळे बारणे यांनी आता यासाठी पुढाकार घ्यावा, असे खुले आव्हान भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले आहे.”