आमदार रवी राणा यांची आमदारकी धोक्यात, निवडणूक आयोगाचे हायकोर्टात निवेदन ..

35

नागपूर दि .१२ (पीसीबी) – गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला दिले. यासंदर्भात मूळ तक्रारकर्ते सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

दरम्यान, आमदार राणा यांना ८ ऑक्टोबर २०२१ रोजी लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १०-ए अंतर्गत कारवाई सुरू करण्याची नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. तसेच ही कारवाई सहा महिन्यांत पूर्ण केली जाईल, असेही सांगितले. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश देऊन याचिका निकाली काढली.

गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी २८ लाख रुपये खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली होती. असे असताना राणा यांनी ४१ लाख ८८ हजार ४०२ रुपये खर्च केल्याचे आढळून आले आहे. राणा यांच्यावरील कारवाईस दिरंगाई होत असल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. ओंकार घारे तर निवडणूक आयोगातर्फे वरिष्ठ ॲड. आनंद जयस्वाल व ॲड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

WhatsAppShare