आमदार यशोमती ठाकूर यांच्या कारला अपघात; शिवशाही बसचालका विरोधात गुन्हा दाखल

89

अमरावती, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेसच्या तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या कारला भीषण अपघात झाला. ठाकूर या नागपूरला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला जात असताना त्यांच्या कारला शिवशाही बसने जोरदार धडक दिली. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावती -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वरखेड फाट्यानजीक घडली.

याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचा चालक सय्यद शादाब अली याच्या विरोधात तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आमदार यशोमती ठाकूर या त्यांच्या (एमएच/ ०९/एटी/४००९) या कारने पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे जात होत्या. दरम्यान परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस (एमएच/२९/बीई/०८०५) या बसने ठाकूर यांच्या कारला कट मारल्याने त्यांची कार दहा फुट खड्यात जाऊन पडली. मात्र सुदैवाने त्या थोडक्यात बचावल्या. तसेच बसमधील १८ प्रवासी देखील सुखरुप आहेत. पोलिसांनी बस चालक सय्यद शादाब अली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.