आमदार महेश लांडगेंचा “यू टर्न” खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी फलदायी ठरणार?

8755

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याच्या प्रबळ इच्छेने आमदार महेश लांडगे यांनी गेली दोन-तीन वर्षे चाचपणी चालवली होती. प्रसंगी त्यांनी विद्यमान शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अंगावरही घेतले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून आमदार लांडगे हे खासदारकीसाठी इच्छुक नसल्याचे चित्र मतदारसंघात निर्माण होऊ लागले आहे. त्यातच भोसरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे हे शिरूरमधून पुन्हा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे पुढे आल्याने आमदार लांडगे हे आगामी निवडणुकीत शिरूरच्या मैदानात नसतीलच अशी अटकळ बांधली जात आहे. लांडगे आणि लांडे यांच्यात पॅचअप होणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. आमदार लांडगे यांच्या या “यू टर्न”मुळे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूर मतदारसंघावर तिसऱ्यांदा भगवा फडकवण्याचा मार्ग आणखी सोपा होणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. शिरूर मतदारसंघावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोनवेळा भगवा फकडवला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकीत आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आव्हान होते. परंतु, राष्ट्रवादीच्याच फितूर नेत्यांच्या मदतीने आढळराव पाटील यांनी सलग दोनवेळा राष्ट्रवादीला पराभवाची चव चाखवली. या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आपल्याच पक्षाचा कोणी खासदार नको आहे. एखाद्याला खासदार करून पुढे आपली डोकेदुखी वाढवण्यापेक्षा विरोधकांचा खासदार बरा, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भावना राहिली आहे. त्यामुळे खासदार आढळराव पाटील यांना गेल्या १५ वर्षांपासून राजकीय जीवदान मिळत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीतही आढळराव पाटील यांना टक्कर देऊ शकेल, असा प्रबळ उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. याची राजकीय जाण असणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी साडेतीन वर्षापूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरूवात केली. लांडगे हे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपचे सहयोगी आमदार आहेत. आमदार लांडगे यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी असणारे गाव दत्तक घेतले. आळंदी नगरपालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालून भाजपला विजय मिळवून दिला. नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. लांडगे यांनी राजकारणात आपला स्वतंत्र दबदबा निर्माण केला. युवा वर्गात पैलवान आमदार म्हणून एक स्वतंत्र क्रेझ निर्माण झाली. त्याच्या बळावर लांडगे यांनी शिरूरचे मैदान मारण्याची चाचपणी सुरू केली.

पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण, रेडझोन, बैलगाडा शर्यत बंदी अशा अनेक प्रश्नांवरून आमदार लांडगे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अंगावर घेतले. आढळराव पाटील यांनी पोराटोरांना गांभीर्याने घेत नसल्याचे वक्तव्य करून सुरूवातीला आमदार लांडगे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. परंतु, लांडगे यांनी नंतर अनेक प्रश्नांवर आढळराव पाटील यांच्यावर मात केली. परिणामी लांडगे आणि आढळराव पाटील यांच्यातील राजकीय शीतयुद्ध पाहण्यास मिळाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांच्यासमोर आमदार लांडगे यांच्याशिवाय दुसरा प्रबळ उमेदवार नसल्याचे चित्र निर्माण झाले. आमदार लांडगे यांनीही लोकसभेच्या तयारीने अनेक प्रश्नांना हात घालून आढळराव पाटील यांचा प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःची राजकीय हवा निर्माण केली.

मात्र आता हे चित्र बदलत असल्याचे आणि आमदार लांडगे यांच्या गोटातून लोकसभेची हवा गायब होत असल्याचे राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे. आमदार लांडगे हे खासदारकीसाठी इच्छुक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच भोसरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभेची पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे आमदार लांडगे हे शिरूरच्या मैदानात नसतीलच, अशी अटकळ बांधली जात आहे. लांडे आणि लांडगे हे जवळचे नातेवाईक असले, तरी ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. लांडे यांचा पराभव करूनच लांडगे आमदार झाले आहेत. मात्र लांडे हे खासदारकी लढवणार असतील, तर या दोघांमध्ये समेट घडणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु, या दोघांनीही ही बाब अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि विलास लांडे हे खासदारकीचे उमेदवार असतील, तर लांडगे हे त्यांना मदत करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लांडे यांनी खासदारकी लढवल्यास लांडगे यांचा दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, लांडे हे खासदारकीच्या मैदानात उतरल्यास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हे मैदान मारणे आणखी सोपे होणार आहे. लांडे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यास त्यांचा आढळराव पाटील यांच्यासमोर निभाव लागणे अवघड आहे. लांडे यांना राष्ट्रवादीच्याच नेत्यांची कितपत मदत होईल, हे सांगणे कठीण आहे. २००९ च्या निवडणुकीत लांडे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळी आढळराव पाटील यांनीच लांडे यांना धूळ चारली होती. त्यानंतर लांडे यांनी लोकसभेचा नाद सोडून दिला होता. परंतु, आता लांडगे यांच्यासोबत पॅचअप करून ते पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या मनःस्थितीत आहेत. या सर्व घडामोडीत आमदार महेश लांडगे यांच्या “यू टर्न”बाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. हा “यू टर्न” खरा ठरला, तर शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूर मतदारसंघावर तिसऱ्यांदा भगवा फडकवण्याचा मार्ग आणखी सोपा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.